बोलेरो – ट्रॅक्टरच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ; दोन जण जखमी

सांगली : मिरजपासून सुरु होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरच्या बेदरकारपणामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महामार्गावर बोलेरो गाडी आणि विरुद्ध दिशेने येत असलेला विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन मिरजजवळ वड्डी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण मयत झाले असून दोन जण जखमी आहेत. मृतांमध्ये चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.बोलेरोमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो समोरुन पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर वड्डी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहोचली असता चुकीच्या दिशेने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. यावेळी भरधाव असणारी बोलेरो समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. ज्यामध्ये गाडीचा चक्काचूर होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

🤙 8080365706