
नवी दिल्ली: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ७०० किमी अंतरावर आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ १७५ किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे. हे वादळ आज कॉक्स बाजार (बांग्लादेश) आणि क्यवप्यूमधील (म्यानमार) किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे.
मोचा या शक्तिशाली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आणि किनारी भागांपासून दूर राहण्याचा इशारा दिला. हे वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बांगला देश आणि म्यानमारने तयारी केली असून, किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
