
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी कसबा बावडा येथील नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची एकमताने आज निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ खरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. राजाराम कारखान्याची नुकतीच झालेली पंचवार्षिक निवडणूक आरोप – प्रत्यारोपांनी प्रचंड गाजली होती. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह माजी आमदार अमल महाडिक यांनी केले होते. तर विरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने 21 पैकी 21 जागा जिंकत कारखान्यावर सहाव्यांदा वर्चस्व कायम ठेवले. लवकरच कारखान्यात को जनरेशन प्रकल्प, डिस्टनरी प्रकल्प कार्यान्वित करण्याची ग्वाही यावेळी नूतन अध्यक्षांनी दिली. अध्यक्षपदी अमल महाडिक यांचे नाव जाहीर होताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.कार्यकर्त्यांनी यावेळी डिजेच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, अशोक पोवार,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तर पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बैठकीला संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, विजय वसंत भोसले, संजय मगदूम, सर्जेराव भंडारे, विलास जाधव, कल्पना पाटील,तानाजी पाटील, मीनाक्षी पाटील, गोविंदा चौगुले, डॉ. विश्वास बिडकर, नंदकुमार भोपळे, वैष्णवी नाईक, सर्जेराव पाटील,संतोष पाटील, सुरेश तानगे, डॉ. मारुती किडगावकर,शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
