
कलबुर्गी : भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे. खुद्द अमित शाह या मिशनवर लक्ष ठेवून आहेत.

काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार यांना अस्मान दाखवण्यासाठी शहा यांनी व्यूहरचना केली आहे. मात्र, दोघेही महावस्ताद निघाले असून, त्यांनी राज्यभर भाजपविरोधात प्रचार तोफा धडधडत ठेवल्या आहेत. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची पाठ टेकवायचीच, त्याचबरोबर प्रियांक खरगेंना पाडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्का द्यायचा यासाठीही भाजपने ‘फिल्डिंग’ लावली आहे. सिद्धरामय्यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री सोमय्या यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या कनकपू मतदारसंघात त्यांच्याच वक्कलिग समाजाच्या आर. अशोक यांना उतरविले आहे.चितापुरातून प्रियांक खर्गेंच्या विरोधात माणिकरत्न राठोड यांना, तर हुबळी-धारवाड मध्यमधून शेट्टर यांच्या विरोधात महेश टेंगिनकाई यांना लांग बांधली आहे. अथणीत सवदींविरोधात महेश कुमठळ्ळी यांना मोठी ताकद दिली जात आहे.
