
कोल्हापूर : मानवी शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण शोधण्याच्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे.

विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी संशोधित केलेल्या “मेथड ऑफ सिंथेसायझिंग निकेल टंगस्टेन ऑक्साईड फिल्मस् फॉर ग्लुकोज सेन्सिंग एप्लीकेशन”या कंपाउंड तयार करण्याच्या पद्धती साठी हे पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे १९ वे भारतीय पेटंट आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च हेड प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. पी. एन. पावसकर, डॉ. धनाजी मालवेकर आणि डॉ. सतीश जाधव यांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी तयार केलेले कंपाउंड हे पातळ फितींच्या स्वरूपात असून त्यासाठी साध्या रासायनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या कंपाउंडचा वापर विद्युत रासायनिक उपकरणात करून रक्तातील साखरेचे प्रमाण अचूकपणे मोजता येणार आहे. या पद्धतीने साखरचे निदान करताना खर्चातही बचत होणार आहे.
पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
