
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शासकीय किंवा खाजगी कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना द्यावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची माहिती भरण्याच्या ‘केसपेपर’मध्ये जातीचा रकाना असून त्याठिकाणी जात लिहिणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. रुग्णांना त्यांची जात विचारुन नंतर उपचार करण्याचा प्रकार, जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा असल्याचे सांगत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्याला विरोध केला आहे.
