
कोपार्डे – कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर वाकरे (ता. करवीर) एसटी चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीवरून येणाऱ्या पती पत्नीला उडवले.

अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव अरूंधती बाळासाहेब पाटील (वय ४८) असे आहे. तर पती बाळासाहेब आकाराम पाटील (वय ५२) (रा. कुडित्रे ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेले प्राथमिक माहिती अशी देवगडहून तुळजापूरला निघालेली एसटी बस (क्रमांक-एम एच २०-बी एल-२९११) कोल्हापूरकडे कोल्हापूर गगनबावडा मार्गे निघाली होती. याच दरम्यान बाळासाहेब पाटील हे आपली पत्नी अरुंधतीसह दुचाकी (क्रमांक एम एच ०९-एफ ए.३४००) वरून कुडित्रे येथे आपल्या गावी निघाले होते. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे-वाकरे दरम्यान असलेल्या वळणावर असलेल्या तीव्र उतारावर एसटी बस आली असता चालक याचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटला. एसटी बसने विरुद्ध दिशेला जात मोटर सायकलने येणाऱ्या बाळासाहेब व अरुंधती पती-पत्नीच्या थेट अंगावर गेल्याने यात पती-पत्नी चिरडले गेले.
