आता हेडफोन शिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास, तसेच ५००० रुपयांचा दंडही होणार

कोल्हापूर : सध्या प्रत्येक जण मोबाईल वापरतो. बस किंवा ट्रेन, लोकल मध्ये प्रवास करताना आपण अनेकदा मोबाईल मध्ये व्यस्त असतो. पण काही लोक असे आहेत जे बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. तसेच फोनवरही जोरात बोलतात. अशा लोकांसाठी मोबाईल वापराबाबत एक नवा नियम आला आहे, ज्यामध्ये तुम्ही बस मध्ये प्रवासा दरम्यान फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा हेडफोन शिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच ३ महिन्यांची शिक्षा देखील होऊ शकते.सध्या हा नियम (नवीन मोबाईल नियम) बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने लागू केला आहे.

या नियमांतर्गत बस मध्ये हेडफोन शिवाय व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. बेस्टने या आठवड्या पासून मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजविण्यास बंदी घातली आहे.

यासंदर्भातील अधिसूचना २५ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. नव्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी बसेस मध्ये सूचना चिकटविण्याचे काम सुरू झाले आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे.मोबाइल फोन बाबत नवा नियम आणण्या मागचे कारण म्हणजे ध्वनी प्रदूषण. यासोबतच बस प्रवाशांच्या गैरसोयी पासून वाचण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. नव्या परिपत्रकानुसार आवाजाची डेसिबल पातळी कमी ठेवण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बस प्रवाशाला फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही.

🤙 8080365706