
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अचानकपणे ते अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचा राजकीय बाँम्ब टाकला.या राजकीय बॉम्बनंतर राज्यासह देशाच्या राजकारणात हादरे बसले आहेत. त्यांच्या निर्णयाने पवार कुटुंबीय सुद्धा द्विधा मन:स्थितीत असल्याचे दिसून आले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयावर त्यांच्या बहिण स्वर्गीय एन. डी. पाटील सर यांच्या पत्नी सरोज पाटील यांचीही अशीच द्विधा मनस्थिती झाली आहे. एकीकडे देशातील वातावरण खराब असताना देशाला पवारांची फार गरज, त्यामुळे पवारांनी निवृत्तीचा निर्णय परत घ्यावा, पण दुसऱ्या बाजूने बहिण या नात्याने शरद पवार आम्हाला खूप वर्ष हवे आहेत, त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, म्हणून अजून खूप वर्ष शरद पवार जगलेही पाहिजेत अशीही आमची स्वार्थी भावना असल्याचे मत शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच, पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल, अशी भीतीही सरोज पाटील यांनी व्यक्त केली. देशातील वातावरण गढूळ, अस्वस्थ असताना अचानक शरद पवार साहेबांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे याचं मलाही अतिशय दुःख वाटत असल्याची भावना सरोज पाटील यांनी व्यक्त केली.
