
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख यांनी सकाळी सकाळीच बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विधान केल्याने देशमुख यांना काँग्रेसने नोटीस दिली आहे. त्याला देशमुख यांनी उत्तरही दिलं आहे. या नोटिशीवर अजून कोणताही निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देशमुख-बावनकुळे यांच्या भेटीचे आगामी काळात परिणाम दिसतील असं सांगितलं जात आहे.
.आशिष देशमुख आज सकाळीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. चहा घेतली आणि चर्चाही केली. आशिष देशमुख हे बावनकुळे यांच्या कार्यालयात तब्बल अर्धा ते पाऊणतास होते.
