
मुंबई : देशात आणि राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या केसेस टाकून तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभात मृत्यू पावलेल्या व्यक्तींविषयी दुःख व्यक्त करत, या घटनेची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी घाटकोपर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मला केंद्र सरकारने ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार घेण्यासाठी मला राष्ट्रपती भवनला जावे लागले. हा पुरस्कार घेण्यासाठी माझ्यासोबत केवळ दहा लोक होते. ‘महाराष्ट्र भूषण’ हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या सन्मानाचा होता. हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या संघटनेने आयोजित केला नव्हता, तर तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. परंतु, राज्य सरकारने खबरदारी घेतली नसल्याने तेथे लोक मृत्युमुखी पडले. पवार म्हणाले.
