
उन्हाळ्यात उष्ण-दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात. त्याला घामोळ्या म्हणतात. या घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता.
कडुलिंबाची पाने :- अंगावर घामोळ्या येऊ नयेत म्हणून कडुलिंबाच्या पानांचा वापर आपण करु शकतो. कडुलिंबाच्या पानांची बारीक पूड मिक्सरमध्ये वाटून तयार करुन घ्यावी. या पावडरमध्ये थोडेसे पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट बनवावी. ही पेस्ट घामोळे असलेल्या भागांवर लावून घ्यावी. ही पेस्ट त्या भागांवर किमान १० ते १५ मिनिटे तशीच लावून ठेवावी. आपल्याकडे कडुलिंबाची पाने उपलब्ध नसल्यास तुम्ही मेडिकल स्टोअर किंवा आयुर्वेदिक औषध दुकानातून कडुलिंबाची पावडर खरेदी करून आणू शकता. त्यात दही किंवा बेसन मिसळूनही त्याची पेस्ट तयार करू शकता. यामुळे तुमची त्वचाही सुंदर होईल आणि शरीरावर घामोळंही येणार नाही.
मुलतानी माती :- त्वचा थंड ठेवण्यासाठी मुलतानी माती खूप प्रभावी असते. गुलाबपाणी, दही, दूध, एलोवेरा जेल यांसारख्या गोष्टींमध्ये मुलतानी माती मिसळून या मातीची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट २० ते २५ मिनिटे त्वचेवर लावून ठेवावी आणि नंतर स्वच्छ आंघोळ करावी.
लिंबू आणि बीटरूट :- बीटरूट किसून किंवा बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि नंतर त्यात अर्धा लिंबू पिळून चांगले मिसळा. ही पेस्ट त्वचेवर २० मिनिटे लावून ठेवावी आणि नंतर स्वच्छ आंघोळ करावी.
