
कोल्हापूर : गेल्या 18 एप्रिल 2023 भूदान दिवसापासून बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्थेच्या गाईंना चाऱ्यासाठी जमीन व पशुसंवर्धन विभागाकडून अर्थसहाय्य अनुदान मिळावे, गाईंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, जळालेल्या वैरणीची नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबा कांबळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. गायींना तहसीलदार पन्हाळा यांचे वतीने बाजार भोगाव सर्कल ऑफिसर बी एस खोत यांनी गट नंबर 600 सरकार हक्कातील जमीन तुम्ही चाऱ्यासाठी वापरू शकता, त्याचबरोबर ही जमीन तुम्हाला भाडेतत्त्वावर देण्याचे दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील राहील, पशुसंवर्धन विभागाकडे मागितलेले अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तीव्र पाणीटंचाई झाल्यामुळे गाईंना पावसाळा येईपर्यंत पाणी देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे पन्हाळ्याचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर दिनांक 20 /4 /2023 रोजी सायंकाळी 7:15 वाजता काटेभोगाव चे सरपंच रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते सरदार आंग्रे बीडिओ सुभाष सावंत यांचे हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण समाप्त केले.
उपोषण काळात अनेक लोकांनी उपोषण स्थळी येऊन सहानुभूती व्यक्त केली होती. उपोषण सोडताना संस्थेच्या अध्यक्षा सौ आनंदी कांबळे, संचालिका सौ मंदाकिनी कांबळे, रमाकांत कांबळे, नामानंद कांबळे,सौ सुनंदा कांबळे, विनायक साळुंखे, केतन आयरे ,सागर वाळवेकर, सुरेश वाळवेकर, बबन खाटांगळेकर ,ग्रामसेवक सौ जाधव बीडिओ कार्यालयातील सेवक भोसले, प्रशासक तळपदे, पोलीस पाटील, संभाजी पाटील, रघु खाटांगळेकर ,जयसिंग पाटील, संदीप चौगुले उपस्थित होते. उपोषण काळात आबा कांबळे यांच्या आरोग्याची काळजी कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर माने, डॉक्टर खाडे व त्यांच्या इतर आरोग्य सेवकांकडून घेतली जात होती.
खासदार संजय मंडलिक, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी गायींना पाणी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले व पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल आबा कांबळे यांनी आभार मानले कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असली चे आबा कांबळे यांनी सांगितले.
