भोगावती शिक्षण प्रसारक मध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नाईकवाडे यांची नियुक्ती

कोल्हापूर : महाराष्ट्रातल्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 35,000 सभासद संख्या असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक प्रदीप चौधरी, धर्मादाय उपायुक्त, कोल्हापूर यांनी आज जाहीर केली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवराज बंडोपंत नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे लांबणीवर पडलेली भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक आज जाहीर करण्यात आली. यासाठी मागील निवडणुकीमध्ये यशस्वी अधिकारी म्हणून कार्य करणारे श्री शिवराज नाईकवाडे यांचा अनुभव व व्यवस्थापन कौशल्य पाहून पुन्हा त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबतचे सर्व अर्ज निकाली काढून या आदेशापासून तीन महिन्याच्या आत निवडणूक घेण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. धर्मादाय कार्यालयाच्या या निर्णयामुळे सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. 2016 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग म्हणून या पॅनल कडे पाहिले गेले होते. या प्रयोगाबाबत आता इच्छुक उमेदवार कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल. तर मतदारांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.