
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. कारण आता ईडीने मोठी कारवाई करत त्यांची तब्बल ११ कोटी संपत्ती जप्त केली आहे.
ईडीने कार्ती चिदंबरम यांवर ही कारवाई केली असून जप्त केलेल्या चार मालमत्तेपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. अशी माहिती ईडीने एका निवेदनात दिली आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे तामीळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. त्यांना सीबीआय आणि ईडी या दोन्हींकडून आयएनएक्स प्रकरणात अटक करण्यात आली होती.
आयएनएक्स प्रकरणात त्यांना ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अटक केली होती. ईडीने 2017 मध्ये INX मीडिया ग्रुपला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (FIPB) मंजूरी देण्यात कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी PMLA अंतर्गत फौजदारी खटला नोंदवला होता.हे प्रकरण INX मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळालेल्या कथित अवैध पैशाशी संबंधित आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने याला मान्यता दिली होती.
