
विवेकानंद कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य या विषयावरील लघुचित्रपट महोत्सवाचे उदघाटन
कोल्हापूर: १९, विवेकानंद कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा आणि उद्योग या क्षेत्रात अनेक यशस्वी विद्यार्थी घडवणारे अग्रमानांकित महाविद्यालय आहे. विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे कॉलेज नेहमी अग्रेसर असते. प्रसारमाध्यमांचे महत्त्व वाढले आहे पण त्याचा दुरुपयोग होता कामा नये. बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना मानसिक आरोग्य महत्वाचे असून कष्टाला मानसिक आरोग्याची जोड दिल्यास निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध युट्युबर कृष्णराज महाडीक यांनी केले.
ते विवेकानंद कॉलेज मधील विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा २०२३ अंतर्गत आयोजित ‘मानसिक आरोग्य’ या विषयावरील लघुचित्रपट महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे हे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी डी. आर. माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले, स्मार्टस ग्लोबल सर्व्हिसचे संचालक रोहित करगावे, विवेकानंद महोत्सवाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार मा. चंद्रशेखर दोडमनी, प्रा. किरण पाटील उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात मा. कौस्तुभ गावडे यांनी नेतृत्व आणि दातृत्त्वाची शिकवण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी दिली. या शिकवणुकीतून आज विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थी देशभर आपल्या कामाचा विविध क्षेत्रात ठसा उमठवीत आहेत. आपला निश्चिय हा अपयशाचे दोर कापून काढत असतो. यासाठी ध्येय निश्चित करा व स्वप्न मोठी पाहा. असे कोणतेही स्वप्न नाही जे आपण पूर्ण करू शकत नाही, त्यासाठी जिद्द, कष्ट व प्रामाणिकपणा यांची जोड असायला हवी. यासाठी आपले मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे. आणि याच मानसिक आरोग्याची माहिती आजच्या लघुचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे असे मत मांडले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक साई दास यांनी मनोगत व्यक्त केले.
या लघुचित्रपट महोत्सवात मानसिक आरोग्य या विषयावरील विविध भाषांतील १२ लघुचित्रपट दाखविण्यात आले. यानंतर या महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या मिस्टर आणि मिस विवेकानंद स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचा मिस्टर विवेकानंद हर्ष जांभळे तर मिस विवेकानंद विदुला चोपदार हे विजेते ठरले. याच बरोबर बेस्ट् पर्सनॅलिटी निहाल रुकडीकर, युनिकनेस – प्रणव कुलकर्णी, बेस्ट् स्माईल – वैष्णवी खांडेकर,बेस्ट् ड्रेस – गौसिया जमादार, बेस्ट् टॅलेंट – निशा भोसले यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुनीता दलवाई, सतीश तांदळे, प्रितेश रणनवरे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरवात रोपट्यास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुचित्रपट महोत्सवाचे समन्वयक डॉ. एस. आर. कट्टीमनी व पाहुण्यांची ओळख डॉ. कविता तिवडे यांनी करून दिली. आभार विवेकानंद महोत्सवाचे सहसमन्वयक प्रा. सनी काळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील व प्रा. समीक्षा फराकटे यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
