विवेकानंद महोत्सवामुळे मिळाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ !

कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. सध्याचा काळ कौशल्य विकासाचा असून अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे.

अशा काळात विवेकानंद कॉलेजने विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला आकार देण्यासाठी, त्याच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा २०२३ चे केलेले आयोजन महत्वपूर्ण आहे. आयोजकांचे जितके कौतुक करावे तितके थोडे आहे असे उद्गार विवेकानंद महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी स्मार्टस ग्लोबल सर्व्हिसचे संचालक मा. रोहित कोरगावे यांनी व्यक्त केले. ते विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आयोजित विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा २०२३ च्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. या महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी, विवेकानंद महोत्सवाचे महत्व अधोरेखित करीत त्याचे नावीन्य विशद केले. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी या नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक विवेकानंद महोत्सवाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले. यावेळी महोत्सवाचा उद्देश त्यांनी कथन केला. विद्यार्थ्यांच्यात संशोधनवृत्ती वाढावी तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक समस्यांच्या निराकरणासाठीची जाणीव निर्माण व्हावी. स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द व चिकाटी निर्माण करून त्याचा विकास होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिवलचे उदघाटन मा. रोहित कोरगावे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फूड फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा खवय्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिवाचन, स्टार्टअप, नाविन्यपूर्ण संशोधन, शॉर्ट फिल्म मेकिंग, रील ओ ऍड, एकपात्री या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ राज्यातील बहुसंख्य महाविद्यालये सहभागी झाली होती.

अभिवाचन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर ,द्वितीय क्रमांक महावीर कॉलेज, कोल्हापूर, तृतीय क्रमांक कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर, स्टार्टअप स्पर्धेमध्ये प्रथम अजिंक्य भोसले, योगेश चोपले, राजे रामराव महाविद्यालय, जत, द्वितीय क्रमांक ऋतुजा पाटील, स्वरूपा पाटील, न्यू कॉलेज, कोल्हापूर, तृतीय क्रमांक श्रीवर्धन शिंदे, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, नाविन्यपूर्ण संशोधन प्रथम क्रमांक वहिदा जमादार, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, द्वितीय क्रमांक प्रेरणा सावंत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, तृतीय क्रमांक स्टेला थॉमस, न्यू कॉलेज कोल्हापूर व श्रीरंगा श्रीकुमार, केरळा विद्यापीठ, केरळा यांना विभागून देण्यात आला. शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आर्टस् & कॉमर्स कॉलेज, नागठाणे, द्वितीय क्रमांक डी. आर. माने कॉलेज, कागल व तृतीय क्रमांक विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, रील ओ ऍड स्पर्धेत प्रथम क्रमांक सतेज राऊत, के. आय. टी. कॉलेज कोल्हापूर, द्वितीय क्रमांक अजय माने, डी. आर. माने कॉलेज, कागल, तृतीय क्रमांक गौरव रोकडे, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, एकपात्री स्पर्धेत प्रथम क्रमांक निहाल रुकडीकर, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, द्वितीय क्रमांक पियुष जमादार, कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर, तृतीय क्रमांक प्रांजल जाधव, वीरमाता जिजाबाई कॉलेज, मुंबई यांनी मिळवला.

या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले तर आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले. या महोत्सवाच्या आयोजनात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706