
नांदेड : निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठिशी मातोश्री उभी राहणार.त्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू नका असे आदेश आले अन् नांदेडच्या कोर्ट परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं.
कोर्टात19 शिवसैनिकांबाबत खटल्याची सुनावणी सुरु होती. नांदेडमध्ये काही वर्षांपूर्वी हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी 19 शिवसैनिकांना नांदेड कोर्टाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. तसेच प्रत्येक आरोपीला 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यातील काही शिवसैनिकांची दंड भरण्याची आर्थिक ऐपत नव्हती. त्यामुळे या शिक्षाविरोधात हायकोर्टात अपिल करणंही अशक्य होतं. अखेर मातोश्रीवर ही बातमी गेली अन् तिथून आदेश आले. शिवसैनिकांसाठीचे लाखो रुपये कोर्टात भरले गेले अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
