
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालानंतर राज्यातील सत्तासमीकरणात काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं की, ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.’अंजली दमानिया यांच्या ट्वीटमुळे राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. कारण काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मध्यंतरी अजित पवार नॉट रिचेबलही झाले होते. मात्र आपली तब्येत ठिक नसल्याने आपण आराम करत होतो, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं होतं. मात्र आता अंजली दमानिया यांच्या ट्वीटने पुन्हा एकदा या चर्चा सुरु झाल्या आहेत.
