
कागल : गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ४४ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.भाषणात मुश्रीफ पुढे म्हणाले, समाजातील विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग यांचे डोंगराएवढे दुःख असते. वृद्ध माणसे ज्यांना मुले -सुना बघत नाहीत, त्यांची परवड तर अत्यंत वेदनादायक असते. या सगळ्यांच्या चरितार्थासाठी ही पेन्शन उपयोगी पडते.
प्रास्ताविकात भैय्या माने म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ हे समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे नेतृत्व आहे. गेल्या तीस – पस्तीस वर्षांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल गोरगरीब माणसाला केंद्रस्थानी ठेवून झाली आहे. *”कृतज्ञतापर सत्कार……….”*
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार मुश्रीफ यानी निराधारांना नियमितपणे दरमहा दोन हजार रुपये पेन्शन द्या, अशी आग्रही मागणी केली आहे. तसेच या योजनेच्या पात्रतेची उत्पन्न मर्यादा ५० हजार करून ज्येष्ठ नागरिकत्वाची वयोमर्यादा ६५ वर्षांऐवजी केंद्र सरकारप्रमाणेच ६० वर्षे करावी, अशी मागणी केली आहे. त्याबद्दल लाभार्थ्यांच्यावतीने आमदार मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार झाला.
यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मनोजभाऊ फराकटे, राजू आमते, रमेश तोडकर, नारायण पाटील, नितीन दिंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
