
कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा टाऊन हॉल पासून दसरा चौक, कोंडाओळ, व्हीनस कॉर्नर असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वेळी या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे, वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे , शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी घरचा राखीव कोटा ठेवावा, वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या सर्व शासकीय जाहिरातीवर सारा वसूल करून त्यातून वृद्ध वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता निवृत्तीवेतन योजना लागू करावी. यासह अधिक मागण्यांची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी मोर्चाचे नेतृत्व राज्य सचिव व जिल्हा संघटक रघुनाथ कांबळे, जिल्हा अध्यक्ष किरण व्हणगुत्ते, कार्याध्यक्ष परशुराम सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मेढे, सुभाष बारदेस्ककर, सुनील पाटील आदींनी केले.
