
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शिवाजी विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती पदवी नुकतीच घोषित केली आहे.

” निम्न प्राथमिक स्तरावरील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या सद्य : स्थितीचा तौलनिक अभ्यास ” या विषयावरती संशोधन करून ज्ञानरचनावादी अध्ययन – अध्यापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची वर्तमानकालीन स्थिती याविषयी वस्तूस्थितीदर्शक निष्कर्ष मांडले आहेत.
तसेच शासनाला व शिक्षकांना संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारशी केलेल्या आहेत. डॉ. रामचंद्र बेलेकर, माजी प्राचार्य, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ आंबोकर यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे . तसेच प्रा. डॉ. नीलमा सप्रे, विभाग प्रमुख डॉ. पाटणकर तसेच एम. फिलच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. पुष्पा वासकर, प्राचार्य डॉ आय. सी. शेख, प्रा. डॉ. सर्जेराव चव्हाण यांचेही अमूल्य मार्गदर्शन एकनाथ आंबोकर यांना लाभले आहे. डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या संशोधनासाठी रत्नागिरी तालुक्यातील तत्कालीन केंद्रप्रमुख यांचे सहकार्य लाभले . तसेच तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व तत्कालीन शिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे यांचेही सहकार्य लाभले .
या सर्वांच्या सहकार्याबद्दल डॉ. एकनाथ आंबोकर यांनी या सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत. जीवनाच्या व पीएच . डी. च्या प्रवासात अनमोल साथ दिली ती पत्नी डॉ. अनिता, चिरंजीव यश व चिरंजीव अंश यांनी. डॉ. अनिता यांच्या सहकार्यामुळेच मी पीएच. डी. पूर्ण करू शकलो असे एकनाथ आंबोकर यांनी न्यूज मराठी 24 शी बोलताना सांगितले.
डॉ. एकनाथ आंबोकर हे सध्या शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) जिल्हा परिषद , कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. डॉ. एकनाथ आंबोकर यांचे राहुल रेखावार ( जिल्हाधिकारी ), संजयसिंह चव्हाण ( मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ), जिल्हा परिषद कोल्हापूर जयंत आजगावकर ( शिक्षक आमदार, पुणे विभाग ), यांनी अभिनंदन केले. खाते प्रमुख, जिल्हा परिषद, कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्ष व शिक्षकेत्तर संघटना व शिक्षकांनी अभिनंदन केल आहे .
