
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीची झीज झाल्याचा संवेदनशील प्रकार सोमवारी प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर आज पहाटेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी मूर्तीची पाहणी करून याबाबत लवकर अहवाल देण्याचे आश्वासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला दिले आहे.

दरम्यान, श्री अंबाबाई मूर्तीची होणारी झीज आणि त्याकडे होणाऱया शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणीही होत आहे.करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षानुवर्षे अभिषेकामुळे देवीच्या मूळ प्राचीन मूर्तीची झालेली झीज तसेच काही घटनांमुळे झालेली इजा पाहता, करवीरपीठाचे शंकराचार्यांसह विविध धर्म अभ्यासक, मूर्ती अभ्यासकांकडून विधिवत नवीन मूर्तीचा मुद्दा पुढे आला होता. पण त्यावर आजपर्यंत वेळ मारून नेण्याचाच प्रकार झाला. परिणामी पुरातत्व खात्याच्या तज्ञांकडून मूळ मूर्तीवर दोन-तीन वेळा नैसर्गिक वज्रलेप व रासायनिक संवर्धन करण्यात आले. तरीसुद्धा मूर्तीची झीज थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे.
