करवीर शिवसेनेत पुन्हा आरोपाच्या फैरी…नरके बगलबच्चानी जीभ आवरण्याचा इशारा !

कोल्हापूर : करवीर तालुका शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटातील शिवसैनिकांमध्ये आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल ठाकरे गट शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला होता. तर नरके यांना गद्दार म्हणून संबोधले होते त्यास प्रत्युत्तर म्हणून नरके गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले होते. जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी नरके यांच्या विजयाद्दल चिंता करू नये असा इशाराही दोन दिवसापूर्वी दिला होता.

त्यास आज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व ठाकरे गटाचे करवीरचे प्रमुख बाजीराव पाटील व तानाजी आंग्रे यांच्यासह 15 जणांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी जो मातोश्रीचा घात करतो तो राजकारणात संपतो असे म्हणत 2009 साली नरके काका-पुतण्यानी उमेदवारीसाठी मातोश्रीवर धाव घेतली होती.. उमेदवारी मिळवून आमदार झाल्यावर त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला असा आरोप केला आहे.

नरके यांची पोपटपंची करणाऱ्या बगलबच्चांनी करवीर तालुक्यात शिवसेनेच्या किती शाखा काढल्या हे सांगावे ? तसेच ठाकरे गटावर बोलताना या बगलबच्चांनी जीभ आवरावी असा इशाराही या शिवसैनिकांनी पत्रकात दिला आहे. पत्रकावर शुभांगी पोवार,सरदार पाटील, सुरेश पोवार,भरत आमते , वंदना पाटील, कृष्णात जासूद आदी 15 जणांच्या सह्या आहेत.

🤙 8080365706