
मुंबई: मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे त्यामुळे ते खोटं बोलत आहेत. असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. दुसरीकडे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेची चर्चा चालू होती. मी तेव्हा तिथे उपस्थित होतो. तेव्हा मी काय म्हणालो, हे मी आत्ता सांगत नाही, नंतर सांगेन”. यावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
