
मुंबई : केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर करून करत असलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

‘राजकीय विरोधकांना व सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवून अटक करायची व त्यांना जमीन मिळू द्यायचा नाही. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा. हे सत्ताधाऱ्यांचे प्रकार बेफामपणे सुरु असून ते भयंकर आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने हे सुरु आहे. जश्या निवडणूका जवळ येतील तसे हे वाढत जाईल. मात्र तुमची रोज 100 प्रकरणं बाहेर येत आहेत. या माहाराष्ट्रात जर झाड मंत्रालयाकडील झाड हलवलं तर 100 प्रकरणं बाहेर पडतील. एलआयसीचे पैसे बुडवल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक कोणी बुडवली? त्यांना साधी नोटीस पाठवायची तरी हिम्मत झाली का? महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाने सगळ्यात मोठा घोटाळा झाला. मात्र सरकार बदललं आणि या प्रकरणाला क्लीनचिट मिळाली. याची चौकशी का होऊ देत नाही. तुमच्या पक्षात सगळे संत महात्मे भरले आहेत का? असा संतप्त सवाल राऊतांनी भाजपाला विचारला आहे. सोमवारी ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जी सुरुवात केली आहे ती लोकशाहीला अत्यंत घातक आहे. 2024 ला सत्तेवर कोण येईल हे सांगता येत नाही. ज्या कोणाचं सरकार येईल आणि ते सरकार तुमच्या पावलांवर पाऊल ठेवेल त्यावेळी तुम्ही काय कराल? तुम्ही पडलेला पायंडा अत्यंत घटक आहे. जे आपल्या बाजूचे आहेत अशा भ्रष्टाचाऱ्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि स्वच्छ करून बाजूला ठेवायचं.
