
मुंबई : मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर हे कार्यकर्ते थेट महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर आता मनसेच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. मनसेत मसल मॅन म्हणून परिचित असलेले मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

मनीष धुरी यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरेंचे कट्टर समर्थक मनीष धुरी हे मनसेचे अंधेरी येथील विभाग अध्यक्ष आहेत. मनीष धुरी राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा सहभाग आहे. मात्र अचनाक मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. धुरी यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
