
मुंबई : जी-२० परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळाला असून, देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-२० च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहे. दरम्यान २६ फेब्रुवारीपासून जी-२० परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. २५ फेब्रुवारी म्हणजेच आजपासून ०२ मार्चपर्यंत जी-२० परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश पोलिसांनी काढला आहे.

याबाबत पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली आहे. पोलीस आयुक्तांचे आदेश! छत्रपती संभाजीनगर शहरात, 27 ते 28 फेब्रुवारी कालावधीत G-20 परिषद असल्याने सदर परिषदेकरता विविध देशातील व आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रतिनिधी हे 25 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठ लेणी, बीबी का मकबरा व इतर स्थळांना भेटी देणार आहे. त्यामुळे जी 20 परिषदेतील प्रतिनिधी यांचे जिवीतास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये व ते राहत असलेल्या मुक्कामाचे ठिकाणी, भेटी देणारे इतर महत्वाचे स्थळाचे भागात सदरवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
