अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘ गाभ ‘ चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा थाटात संपन्न

कोल्हापूर : आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला गाभ’ हा चित्रपट आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला.

यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत.

सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे. त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. आगामी ‘गाभ’ या मराठी चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमेंटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे.या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि सहनिर्माते अनुप जत्राटकर सांगतात की, एक विचार या चित्रपटातून मांडताना त्यातील आशावाद ही आम्ही चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा ‘गाभ’ केवळ ‘शारीरिक’ नसून ‘वैचारिक’ देखील आहे. केवळ कांहीतरी ग्रामीण करुया, म्हणून हा चित्रपट केलेला नाही. तर, आजवर कधीही रुपेरी पडद्यावर आली नाही अशी एक गोष्ट आम्ही सादर करीत आहोत. शहरी ऑडियन्सलाही आवडेल असा हा चित्रपट आहे. प्रेक्षक चित्रपटाशी पूर्णपणे एकरूप होईल, यातल्या पात्रांसोबत तो हसेल, आणि त्यांच्या दुखाने हळहळलही! निर्माते मंगेश नारायण गोटूरे म्हणाले की, ‘गाभ’ ची कथाच इतकी भन्नाट होती की ती ऐकता क्षणीच निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ज्याला ज्याला कथा ऐकवली त्या सर्वांनी त्यात काम करण्याची तयारी दाखवली. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात चित्रीकरण झालं असलं तरी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत आम्ही कोठेही तडजोड केलेली नाही. पोस्टर प्रदर्शन ही चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात असून आता येथून पुढच्या काळात आम्ही हा चित्रपट विविध महोत्सवांना पाठविणार आहोत. साधारण मे महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, विकास पाटील, सायली बांदकर, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते, संगीत, आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी तर पार्श्वसंगीताची जबाबदारी रविंद्र चांदेकर यांनी सांभाळली आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गाणू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर चंद्रशेखर जनवाडे तर प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत.

🤙 8080365706