
पुणे : राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून संपामुळे बारावी परीक्षेशी संबंधित कोणतेही काम न करण्याच्या निर्णयावर शिक्षकेतर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱया बारावी परीक्षांच्या आयोजनात प्राचार्य आणि शिक्षकांची कसोटी लागली आहे.

अनेक महाविद्यालयांनी कंत्राटी तत्त्वावरील शिक्षकेतर कर्मचाऱयांवर परीक्षा कामकाजाची जबाबदारी सोपविली आहे. परीक्षा काळात कंत्राटी कामगारांना सुट्टय़ा न घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार इतिवृत्त न निघाल्याने संयुक्त कृती समितीने बेमुदत संप करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या संपाचा फटका राज्यातील बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना बसण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मुंबईतील बहुसंख्य कॉलेजमधील 100 टक्के शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील सर्वच अशैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत. बऱयाच महाविद्यालयांत परीक्षेच्या कामकाजात कंत्राटी कर्मचाऱयांची मदत घेतली जात आहे. सोमवारी संपाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी संप करणाऱया कर्मचाऱयांना पोलिसांकडून समज देण्यात आली. उद्या परीक्षेच्या वेळेत संपकरी कर्मचाऱयांनी कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करून गोंधळ करू नये, अशा सूचना पोलिसांमार्फत देण्यात आल्या आहेत.
