
मुश्रीफांनी महिलांची माफी मागावी: राजमाता जिजाऊ महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांचे पत्रक
कागल : कागल शहरात शिवजयंतीदिनी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा, सौ नवोदिता घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने काढलेल्या महिलांच्या रॅलीमध्ये मगरुरपणे गाडी घुसवणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांचा समस्त महिलांनी जाहीर निषेध केला आहे.

आमदार मुश्रीफ यांनी महिलांचा केलेल्या या अपमानाबद्दल जाहीर माफी मागावी. अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वरे महिलांनी केली आहे. पत्रकातील मजकूर असा काल रविवारी(ता.१९) शिवजयंतीच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे व सौ श्रेयादेवी घाटगे यांच्यासह शेकडो महिला महिला शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवरायांचा पाळणा जोजवण्यासाठी बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे श्रीराम मंदिर येथून एस टी स्टँड कडे रॅलीने निघाल्या होत्या. यावेळी बसस्थानकाकडून आपल्या चार चाकी गाडीतून आलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली गाडी महिलांच्या या रॅलीमध्ये मगरुरपणे घुसवली.खरेतर समोरून महिला रॅली येत आहे तर जबाबदार लोकप्रतिनीधी म्हणून किमान आज छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी तरी त्यांचा सन्मान म्हणून पाच मिनिटे आपली आलिशान गाडी बाजूला घ्यावयास हवी होती.एवढे सौजन्य दाखवून समस्त महिला महिलांचा सन्मान करावयास हवा होता .पण तसे घडले नाही.उलट महिलांच्या रॅलीमध्ये गाडी घुसउन त्यांनी कसला पुरूषार्थ दाखवला.तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामपणे शिवरायांऐवजी मुश्रीफ यांच्या नावाची घोषणाबाजी करून समस्त महिला वर्गांचा अपमान केला आहे. त्यामुळे महिलांची रॅली विस्कळीत झाली व महिलांना गर्दीचा त्रास सहन करावा लागला. आमदार मुश्रीफ यांना नगरपालिकेच्या दारात महिलांची ही रॅली जाईपर्यंत गाडी थांबण्यासाठी जागा उपलब्ध होती. किंवा अन्य पर्यायी मार्गाने जाता येणे शक्य होते. मात्र त्यांनी जाणून-बुजून या ऐतिहासिक कार्यक्रमास बाधा आणण्याच्या दृष्टीने महिलांच्या रॅलीमध्ये गाडी घुसवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात महिलांचा मानसन्मान केला. त्यांचा आदर्श सर्वत्र आजही जपला जात आहे. परंतु कागल मध्ये मुश्रीफ यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे मुश्रीफ यांच्याकडून महिलांच्या झालेल्या या अपमाना बद्दल त्यांनी महिलांची जाहीर माफी मागावी. तसेच यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून वारंवार महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली जात होती. आता यावर कळस म्हणून थेट मुश्रीफ यांनी महिलांचा अपमान केला आहे, याबद्दल माफी मागा अन्यथा तमाम जिजाऊंच्या लेकी येत्या काळात चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. या प्रसिद्धी पत्रकावर माजी उपनगराध्यक्षा नम्रता कुलकर्णी ,नगरसेविका विजया निंबाळकर, शितल घाटगे, सुधा कदम,रेवती बरकाळे प्रतिभा गजबर शितल माने शितल तिप्पे,शर्मिष्ठा कागलकर आदींच्या सह्या आहेत.
