
पन्हाळा : ‘जय भवानी, जय शिवाजी” छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जय घोषाने पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले आहे.

आज रविवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यासाठी गेले दोन दिवसांपासूनच गडावर शिवभक्तांची गर्दी झाली आहे.महाराष्ट्रातील एकमेव शिवमंदिर पन्हाळगडावर असून या ठिकाणाहून शिवभक्त शिवज्योत नेण्याचि परंपरा आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली आहे. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्यावतीने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच गडावर ठिकठिकाणी पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्याचबरोबर शिवमंदिर, बाजीप्रभूपुतळा, शिवाकाशिदपुतळा याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाई पहायला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच येणाऱ्याशिवभक्तांसाठी लाईट, पाणी याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पन्हाळ्याहून शिवजयंतीनिमित्ताने १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात. दरम्यान, उद्या रविवारी शिवजंयती निमित्त सकाळी 10:10 वाजाता शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे.तसेच पन्हाळा युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवजयंती उत्सवा निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
