शिर्डीत महाशिवरात्री उत्साहात साजरी; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिर्डी : सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

उपवासाचे महत्त्व लक्षात घेता साईप्रसादलयामध्ये भक्तांसाठी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाण्यापासून खिचडी बनवण्यात आली आहे. तर त्यासोबत शेंगदाण्याचे झिरके आणि रताळ्याचा शिरा असा मेनू भाविकांना दिला जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना साबुदाणा खिचडी आणि झिरक याचा महाप्रसाद देण्यात आला. महाशिवरात्री निमित्‍त साईबाबांच्‍या समाधीवर व मुर्तीला बेलपत्राचा हार घालण्‍यात आला होता.साई भोला भंडारी असा जयघोष करत लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होत आहेत. मध्यान्ह आरतीला साईबाबांच्या समाधीवर भगवान शंकराची प्रतिमा ठेवण्यात येऊन आरती करण्यात आली. यावेळी साई मूर्तीला शुभ्र पांढरी शाल त्यावर बेलाची माळ असा साज चढवण्यात आल्याने साईबाबांची मूर्ती अधिकच आकर्षक दिसत होती. मोठ्या भक्तीमय वातावरणात भाविक साई समाधीचे दर्शन घेताना दिसून येत आहेत. मध्यान्ह आरतीला साईबाबांना आज साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे झिरक आणि रताळ्याचा शिरा असा नैवेद्य दिला गेला. त्यानंतर साई प्रसादालयात देखील भाविकांना हेच उपवासाचे पदार्थ वाढण्यात आले. आज दिवसभरात 70 ते 80 हजार भाविक साईप्रसादाला येतील, अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादाला यात हा साडेपाच हजार किलोचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे.

🤙 8080365706