उंच टेकडीवरील सातेरी पांडवकालीन महादेव मंदिर

कोल्हापूर (सुनंदा सुतार) : कोल्हापूरच्या पर्यटनात भर घालणारे आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मंदिर म्हणजे करवीर तालुक्यातील सातेरी मंदिर.

कोल्हापूर पासून पश्चिमेला अंदाजे २५ किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर पांडवकालीन महादेव मंदिर आहे .

एकाच दगडात कोरलेले आणि लेण्याच्या रूपात असलेले मंदिर अत्यंत सुंदर व देखणे आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे .शिवलिंगावर महादेवांचे आयुध म्हणजे त्रिशूळ आहे .मंदिराच्या उजव्या बाजूच्या गुहेतून प्रवेश केल्यानंतर गणपतीची संगमरवरी सुंदर मूर्ती आहे. तसेच पार्वती मातेचेही दर्शन आपल्याला इथे होते. मंदिराबाहेर एकाच दगडात कोरण्यात आलेली नंदीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. उंच टेकडीवर अंदाजे 30 ते 40 फूट खोल विहीर आहे. सध्या ही विहीर रिकामीच असते पण पूर्वी मात्र ही विहीर एक स्त्रोत होती आणि या विहिरीचे पाणी रंकाळा तलावाला मिळायचे अशी आख्यायिका आहे. शेजारी असणाऱ्या आमशी गावातील श्रीक्षेत्र शंभू महादेव देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. श्रावणातील सोमवारी व इतर सोमवारी सुद्धा मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीला तीन दिवस यात्रा असते. आमशीतून पालखीची सुरुवात होऊन बीडशेड वर मोठा रिंगण सोहळा असतो तर महादेव मंदिराच्या पायथ्याशीही गोल रिंगण सोहळा असतो. कीर्तन ,प्रवचन यांसारखे कार्यक्रम होतात तसेच प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे वाटप ट्रस्ट च्या वतीने करण्यात येते.

महादेव मंदिराच्या पायथ्याला शांततामय वातावरणात अत्यंत प्राचीन आणि साध्या बांधकामात असलेले सातेरी चे मंदिर आहे. या ठिकाणी सात देवींच्या मूर्ती आहेत. पूर्वी बीड गावच्या पाटलाच्या सात मुली या ठिकाणी गायब झाल्या म्हणून याला सातेरी असे नाव पडले अशी आख्यायिका आहे.

पायथ्याला सातेरी मंदिर आणि टेकडीवर महादेव मंदिर असे निसर्गाच्या सानिध्यात असणारे सातेरी महादेव मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान बनले आहे.

🤙 8080365706