कसबा बीड येथील हेमाडपंथी बांधकामातील कल्लेश्वर महादेव मंदिर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पश्चिमेस अवघ्या १६कि.मी अंतरावर तुळशी व भोगावती नदीच्या संगमावर धार्मिक स्थान असलेले करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे अकराव्या शतकात बांधण्यात आलेले कल्लेश्वर महादेवाचे मंदिर पहायला मिळते.

हे गाव भोज राजाची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात बीड तसेच आसपासच्या गावातील लोक कल्लेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. “गावाच्या मध्यभागी हे पुरातन कल्लेश्वर महादेवाचे मंदिर आहे, भोजराजाच्या काळात साकारलेल्या या मंदिराचे बांधकाम हेमांडपंथी आहे. मुख्य मंदिराचा आवार विस्तीर्ण असुन प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर भिंतीला टेकून ठेवलेले अनेक विरगळ इथे दिसतात. इथे दिसणाऱ्या विरगळांची संख्या जास्त आहे. आजही या गावात घराचा पाया खोदताना देखील सहजपणे अशा वेगवेगळ्या आकारातील विरगळ सापडतात.जुने, दगडी घुमट, असेही अवशेष या ठिकाणी दिसतात.

कल्लेश्‍वर महादेव मंदिर प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आहे. दीपमाळेच्या पाठीमागे भिंतीला टेकून गजलक्ष्मीचे छोट्या आकारातील प्राचीन भग्न झालेले दगडी शिल्प ठेवलेले आहे. राष्ट्रकूट राजवटीच्या राजचिन्हाचे संदर्भ असलेले हे शिल्प आहे. या मंदिराला प्रवेशासाठी तीन दरवाजे असून मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर गणपतीची छोटी दगडातील मूर्ती आहे.मंदिर अठरा स्तंभावर उभारलेले दिसते. मुख्य मंदिरात तीन प्रमुख भाग दिसतात. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह. गर्भगृह तीनही बाजूनी बंदिस्त असून गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. त्याच्या समोरच नंदी आहे. कल्लेश्‍वराचे हे मंदिर ग्रामदैवत म्हणूनच मानले गेलेले आहे. गर्भगृहात शिवाचे पितळी मुखवटे पाहावयास मिळतात. गर्भगृहाच्या खाली मधोमध चौरस व वरती गोल अशी चार संगमरवरी स्तंभांची मेघडंबरी आहे. यातच कल्लेश्‍वराचे शिवलिंग स्थापित केलेले आहे.

कसबा बीडमधील कल्लेश्‍वर महादेवाच्या पुरातन मंदिराबरोबरच या गावचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सोन्याची छोट्या मोठ्या आकारातील नाणी सापडतात. विशेषतः येथील सोन्याचा माळ यासाठी प्रसिद्ध आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर ही नाणी शक्यतो लोकांना सापडतात. यावर त्रिशूल, महादेवाची पिंड अशा छाप असणाऱ्या सोन्याच्या या मुद्रा असतात.

🤙 8080365706