
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी ग्लोबल बिझनेस समिटमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. देशातील अनेक ओपिनियन मेकर्स दर सहा महिन्यांनी तेच ‘प्रॉडक्ट’ पुन्हा लॉन्च करण्यात व्यस्त आहेत. आणि या रीलाँचमध्येही ते नवी कल्पना लढवू शकत नाहीत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसला. 2014 पूर्वी केवळ एका कुटुंबाची काळजी घेतली जात होती. राजीव गांधी म्हणायचे की एक रुपया पाठवला तर १५ पैसे तळापर्यंत पोहोचतात.त्यांच्या म्हणण्यानुसार विचार केला तर आम्ही 85 टक्के पैसा वाचवला. काही लोक गरिबी हटवण्याविषयी बोलत होते, परंतु सत्य हेच आहे की पूर्वी गरीबांना देशावरील ओझे मानले जात होते. आमचे लक्ष गरीबांना सक्षम करण्यावर आहे, जेणेकरून ते त्यांच्या पूर्ण क्षमतेने देशाच्या जलद विकासात योगदान देऊ शकतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये देशात 100 हून अधिक जिल्हे अत्यंत मागास होते. आम्ही या मागास जिल्ह्यांच्या विकासाची संकल्पना नव्याने मांडली. नऊ वर्षांत साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते गावांमध्ये बांधले गेले.तीन कोटी गरीब कुटुंबांना घरे दिली. जेव्हा जग कोरोनाच्या संकटातून जात होते, तेव्हा भारतातील लोकांनी आपत्तीचे संधीत रूपांतर कसे करायचे हे जगाला दाखवून दिले. ग्लोबल बिझनेस समिटमध्येही भारताच्या क्षमतेचा प्रतिध्वनी ऐकू येत आहे.
