
शासकीय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप
कागल : लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे आमचे कर्तव्यच….आहे.आम्ही काही त्यांचेवर उपकार करीत नाही असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.

येथील शाहू कारखान्याच्या प्रधान कार्यालयात कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ ,इंदिरा गांधी व राष्ट्रिय कुटुब कल्याण या शासकीय योजनेतील पंच्यान्नव पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, शासकीय योजना या तळागाळातील माणसांना आधार देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या आहेत. मात्र गेल्या पंचवीस वर्षात कागल तालुक्यामध्ये या योजनेचा जाणीवपूर्वक बाजार मांडला आहे.या योजना निपक्षपातीपणे सर्वसामान्यापर्यंत पोचल्या नाहीत. उलटपक्षी लाभार्थ्यांकडून कमिशन घेणे,त्यांची पासबुके स्वतः जवळ ठेवणे,पैसे वेळेत न देणे अशी गैरकृत्य या योजनेमध्ये झाली आहेत असे काही लाभार्थ्याकडूंच बोलले जाते. राजे बँकेत लाभार्थ्यांची पेन्शन ज्या दिवशी जमा होते त्याच दिवशी त्यांना घरपोच दिली जाते. मग इतर बँकेत विलंब का लागतो ? असा सवाल उपस्थित करून घरपोच सेवा मिळण्यासाठी सर्वच लाभार्थ्यांनी आपली खाती राजे बँकेत काढण्याचे आवाहन केले. राज्यातील सरकार हे ” कॉन्ट्रॅक्टरांचे नव्हे ” तर हे “आपलं सरकार ” असल्याचे श्री.घाटगे यांनी यावेळी नमूद करत ज्या पात्र लाभार्थ्यांना अद्यापही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही त्यांनी तत्काळ आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते सरदार इसाक फकीर (कागल), मंगल मारुती शिंदे (मांगनूर), समीर सुनील येजरे( मुगळी), सविता तानाजी आगळे (सिद्धनेर्ली), अमर विकास गोसावी (सुळकुड), सुप्रिया हजारे (चिखली) या सहा लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाहू कारखान्याचे संचालक प्रा. सुनील मगदूम, संजय पाटील बेलवळे,कागल तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रताप पाटील,पी.डी.चौगुले, संदेश पाटील, सुशांत कालेकर, बाळासो नाईक, गजानन माने, स्वप्निल शिंगाडे ,लखन मकवाने, शंकर माळवी, सागर मोहिते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक अरुण गुरव यांनी केले.तर आभार विकी डोणे यांनी मानले.
*चौकट*
आम्ही काही त्यांचेवर उपकार करीत नाही* शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उपकार केल्याची वागणूक अनेकजण देतात. त्यांना हेलपाटे मारायला लावतात. कमिशनच्या हव्यासापोटी त्यांना नाहाक त्रास दिला जातो. हे खुपच दुर्दैवी आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आपल्या या बांधवांना मदत करणे हे तर लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्यच असून आम्ही काही त्यांचेवर उपकार करीत नाही, राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
