बालिंग्यातील माथेफिरूकडून भटक्या कुत्र्याच्या पिलाची हत्या; गुन्हा दाखल

कोल्हापूर: शहराजवळील बालिंगा गावात नारायण विठ्ठल पित्रे या इसमाने घराच्या आवारात आल्याच्या रागातून भटक्या कुत्र्याच्या पिलाची डोक्यात काठी मारून हत्या केली. याबाबत प्राणी प्रेमी संघटनांनी आवाज उठवताच पित्रेविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर शहराजवळच्या बालिंगा गावात नारायण पित्रे नावाचा इसम राहतो. भटक्या कुत्र्यांबद्दलचा राग मनात ठेवून त्याने आपल्या घराजवळ आलेल्या कुत्र्याच्या पिलाची डोक्यात काठी घालून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. ही बातमी कळताच कोल्हापुरातील पीपल फॉर ॲनिमल सोसायटीच्या प्रशांत साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या पिलाला त्यांनी कोल्हापुरातील डॉक्टर संतोष वाळवेकर यांच्या दवाखान्यात नेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या पिलाचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशांत साठे यांनी करवीर पोलीस ठाण्यात पित्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संशयित पित्रे हा मनोरुग्ण असून त्याने यापूर्वीही अनेक निष्पाप कुत्र्याच्या पिलांना विष घालून ठार मारल्याची परिसरात चर्चा सुरू होती. घटनास्थळी करवीर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी प्रशांत साठे, मार्क गर्दे ,करुणा लोखंडे मिनाक्षी कांबळे, माया जाधव, अंजली तुंगडकर, हेमा बोरकर, चाँद सौदागर, विवेक पटवर्धन यांच्यासह प्राणीप्रेमी कार्यकर्ते आणि नागरिकांनी पित्रे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच त्याच्या घरासमोर घोषणाबाजीही केली.

🤙 8080365706