
औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून केल्याची घटना घडली.

अनिता संतोष लांडे (वय 47 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून, मनिषा काकासाहेब लांडे (वय 44 वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील लांडे कुटुंब माहुली शिवारात गट क्रमांक 13 मध्ये वास्तव्यास आहे. घरात अनिता संतोष लांडे व मनिषा काकासाहेब लांडे या दोघी सख्ख्या जावा असून यातील मोठी अनिता या अपंग आहेत. तर लहान मनिषा मनोरुग्ण असल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान सोमवारी रात्री मनिषाचे स्वत: वरील संतुलन सुटल्याने, हातात धारदार शस्त्र (कुऱ्हाड) घेऊन थोरल्या जाऊ अनिता संतोष लांडे यांच्या डोक्यात मारले. त्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला.
