सप्तगंगा कारखान्याचं खासगीकरण करून झालं म्हणूनच आता सतेज पाटलांची नजर राजारामवर – दिलीप पाटील, चेअरमन

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक जवळ येताच सतेज पाटील यांनी कार्यक्षेत्राचे दौरे चालू केले आहेत. ठिकठिकाणी मेळावे घेऊन महाडिक परिवारावर टीका करण्यात ते नेहमीप्रमाणे गुंतलेले दिसतात. ५ वर्षं कधी कारखान्याचा चेहराही न बघणाऱ्या या व्यक्तीला निवडणूक म्हटलं की लगेच कारखान्याची चिंता वाटायला लागते.

अचानक एवढी काळजी वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे सप्तगंगा साखर (डीवाय. शुगर्स) कारखान्यातील सहकार संपवून खासगीकरणाचं उद्दिष्ट तिथे पूर्ण झालेलं आहे, म्हणूनच आता त्यांची नजर राजाराम साखर कारखान्यावर आहे. एवढीच जर सहकाराची काळजी होती तर जिल्ह्यातील जे इतर कारखाने खरोखर अवसायनात निघाले ते कारखाने वाचवायला सतेज पाटलांनी कधी पुढाकार का घेतला नाही ? राजाराम कारखान्यावरच डोळा कशासाठी ? हे सर्वांनाच माहिती आहे.

मागील 2 निवडणुकांमध्ये यांचा एक डायलॉग फिक्स आहे. प्रत्येक वेळेस हे येऊन सांगतात, “आता नाही तर कधीच नाही.” आणि पुन्हा पुढच्या वेळेस विरोधात निवडणूक लढवायला येतात, कारण या कारखान्यामध्ये हुकूमशाही नाही लोकशाही आहे. आणि म्हणूनच प्रत्येकवेळेस ते इथे येऊन विरोधात बोलू शकतात, लढू शकतात. याउलट सप्तगंगा (डीवाय) कारखान्यात कोणीही जाऊन बघावं. आधी नाव बदललं , नंतर एका रात्रीत ५००० सभासद कमी केले. आणि पहिल्या ५ च वर्षात कारखान्यातील संपूर्ण सहकार संपवून टाकला, कारखाना प्रायव्हेट लिमिटेड केला. आज तिथे दुसरा कोणी विरोधात उभाही राहू शकत नाही, ना दुसऱ्या कोणाला चेअरमन म्हणून संधी दिली जाते. एवढंच काय तर तिथल्या उरल्यासुरल्या सभासदांना संचालक मंडळात कोण आहे हेही माहिती नसतं. इतका हुकूमशाही कारभार करणारा व्यक्ती इथे मात्र चांगुलपणाचा मुखवटा घालून आम्हाला सहकाराचे धडे शिकवायला येतो, याचं आश्चर्य वाटतं ! नेहमी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या सतेज पाटलांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर सहकाराचा एवढाच पुळका आहे, तर जेव्हा सप्तगंगा (डिवाय) साखर कारखाना पहिल्यांदा त्यांच्या ताब्यात आला तेव्हा असलेल्या सर्व सभासदांना त्यांनी पुन्हा सभासदत्व बहाल करावं. त्यांना त्यांच्या मतदानाचे अधिकार द्यावेत. आधी असल्याप्रमाणे कारखान्याला खरी ओळख म्हणजे सप्तगंगा हे नाव द्यावं. आणि मग इकडे येऊन आम्हाला त्यांनी शहाणपणा शिकवावा.

प्रत्येक निवडणुकीत नेता आणि निष्ठा बदलणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन सहकार आणि लोकशाहीची टिमकी सतेज पाटलांनी वाजवू नये. त्यांच्यासोबत असलेली ही व्यक्ती कधीकाळी आमच्यासोबत राहून चेअरमनाचा पूर्ण उपभोग घेऊन आता तिकडे गेली आहे. तेव्हा हेच सर्जेराव माने सतेज पाटील यांच्यावर टीका करायचे. त्याचेही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले पुरावे आमच्याकडे आहेत. हवं तर खुल्या व्यासपीठावर त्यांची तेव्हाची वक्तव्यं वाचून दाखवतो. सर्जेराव मानेंच्या तत्कालीन वक्तव्यांवर आधी सतेज पाटलांनी खुलासा द्यावा आणि मग खुशाल त्यांना सोबत घेऊन फिरावं. तरीही जर त्यांना विरोधाला विरोधच करायचा असेल तर पुराव्यानिशी बोलण्यासारख्या आमच्याकडेही भरपूर गोष्टी आहेत, हे त्यांनी विसरू नये. धन्यवाद !

चौकटराजाराम कारखान्यावर टीका करणाऱ्या सतेज पाटील यांना आमचे फक्त 5 प्रश्न आहेत. उत्तरं देण्याची जर त्यांची तयारी असेल तर त्यांनी कधीही एका व्यासपीठावर यावं.

दिलीप भ. पाटील.चेअरमन, श्री छत्रपती राजाराम सह.साखर कारखाना

🤙 8080365706