
कागल : गेल्या अडीच वर्षांत मुश्रीफसाहेब आपण किती घरकुले मंजूर केली याचा एकदा खुलासा कराच. श्रेयवादाच्या लढाईत मला उतरायचे नाही मात्र जे काम आपण केलेच नाही ते काम केल्याचे सांगत स्वतःचे अपयश लपविण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहात ही बाब खूपच दुर्दैवी आहे .मात्र अवघ्या सहा महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कृपाशीर्वादाने कागल तालुक्यातील ४९ बांधकाम कामगारांच्या घरकुलांचा प्रश्न मार्गस्थ लावण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

घरकुले मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात आज बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने देण्यात येणा-या शिल्डचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते. घाटगे म्हणाले याआधी मंजूर घरकुलांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा. तो थांबविण्यासाठी आपण कामगार मंत्री सुरेश खाडे यांना भेटून सदर निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची विनंती केली आहे.त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथून पुढेही या कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांचा उपस्थित असलेल्या ४९ बांधकाम कामगारांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
किसान मोर्चाचे कागल तालुका अध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले एकूण पाच टप्प्यात लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत.आजमितीस तालुक्यात ३२ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून या सर्वांनाच राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली लाभ मिळत आहे.
यावेळी राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदु माळकर, संचालक राजेंद्र जाधव, अरूण गुरव, जनार्दन निऊंगरे, दिलीप पाटील,राजू शिंदे , सुर्यकांत पाटील ,विजय राजगिरे, आनंदा हातकर यांच्यासह लाभार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…स्वागत प्रास्ताविक विनायक मांगोरे यांनी केले तर आभार तानाजी पाटील (बेलेवाडी काळमा) यांनी मानले….
चौकट……
यासाठीच मुंबईला खेटे…….
घरकुलांचा श्रेयवाद लाटणाऱ्यांना मी विचारू इच्छितो मुश्रीफसाहेब आपण स्वतः मंत्री असताना बांधकाम कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न का सुटला नाही? हा कळवळा आपणास आत्ताच कोठून आला ? असा प्रश्न समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित करून माझ्यावर मुंबईला खेटे घातल्याचा आरोप करणाऱ्यांना सांगू इच्छितो, या कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठीच मी आजपर्यंत मुंबईला खेटे घातले आहेत. त्यामुळेच तर आज या आपल्या कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
