कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शहराच्या सौदर्यांत भर घालणारा आणि महापुरात संपर्क तुटू नये यासाठी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिजची पायाभरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी खासदार महाडिक यांनी नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले,कोल्हापूरचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये खूप खालच्या पातळीचे झालं आहे. सत्तेचा वापर कोल्हापूरच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःसाठी केला गेला. त्यामुळे बाहेरील नागरिक देखील कोल्हापूरकडे वेगळ्या नजरेनं पाहत आहेत, पण आता मी खासदार झालो आहे, आता फक्त कोल्हापूरचा विकास आणि विकासच केला जाईल. , कोल्हापूर शहरात आणखी 7 उड्डाण पूल हवे आहेत, गडकरी साहेब आम्हाला या पुरातून वाचवा, दरवर्षी अनेक गावं पाण्यात जातात, अशी मागणी महाडिक यांनी केली.
कोल्हापूर महापालिकेला 75 इलेक्ट्रिकल बस हव्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, कोल्हापूर शहराला एक चांगलं प्रवेशद्वार असावं ही माझी संकल्पना होती. बास्केट ब्रिजचं सगळं सादरीकरण त्यांनी बघितलं आणि फक्त पाच मिनिटांमध्ये साहेबांनी 180 कोटी रुपये मंजूर केले. डिझाईनमध्येही बदल केला नाही. तसेच बास्केट ब्रिज नाव का दिले हे पण साहेबांनी विचारलं. मी सांगितलं तो पिलर लेस ब्रिज आहे आणि मुंबईमधील वरळी सी लिंकप्रमाणे असेल. आज त्याची पायाभरणी होत आहे.
बास्केट ब्रिज तीन ऐवजी चार लेन करावा, अशी विनंतीही त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. तसेच प्रस्तावित आयलंडमध्ये भव्य शाहू महाराजांचे पुतळा व्हावा, हायवे पासून ते विमानतळ चौपदरीकरण व्हावे, पन्हाळा, जोतिबा, गगनबावड्यासाठी रोप वे केबल कार्स मिळाव्या, अशी मागणी त्यांनी केली.
आमचे नेते आदरणीय महादेवराव महाडिक यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. त्यांची एकच शिकवण होती आपल्याला जर काय बदल करायचे असतील तर दुसऱ्याला नाव ठेवून चालणार नाही,आपणच स्वतः त्या मैदानात उतरावं लागेल. आपल्यालाच बदल करावे लागतील. प्रामाणिकपणे लोकांची सेवा करावी लागेल, अशी शिकवण महादेवराव महाडिक यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने 2019 ला माझा पराभव झाला आणि आमच्या या कामाची खिल्ली उडवली गेली. ह्या हवेतल्या गोष्टी आहेत.. कुठे आहे महाडिकांचा ब्रिज? पण पराभवामुळे फार बोलता येत नव्हतं, पण पाठपुरावा सोडला नसल्याचं हि त्यांनी सांगितलं.
आमच्या पूर्ण महाडिक घराण्यावर टीका झाल्या. मी गेले दोन-तीन महिने खासदार झाल्यापासून साहेबांना भेटत होतो. बास्केट ब्रिज पायाभरणी कार्यक्रम हा गडकरी साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे असा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा आग्रह होता. 12-13 वर्षे सत्ता विरोधकांच्या ताब्यामध्ये होती, पण या सत्तेच्या माध्यमातून असा कुठलाही भरीव प्रकल्प कोल्हापूरकरांनी पाहिला नाही, पण जो करत असेल त्याला विरोध मात्र करतात. आता मी खासदार झालो आहे, आता कोल्हापूरची ओळख फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट म्हणून घेतली जाते.
