
पुणे – महाराष्ट्र सरकारकडून उद्योगांना सहकार्य मिळेल, त्यासाठी सवलती आणि पायाभूत सुविधा मिळतील, अशी खात्री पटल्यामुळेच जगभरातील कंपन्यांनी महाराष्ट्रात त्यांचे उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळेच दावोसमध्ये हजारो कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. या करारानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग सुरु होणार आहेत. शिवाय विविध देशांच्या प्रमुखांनीही महाराष्ट्रात विविध उद्योग सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नेमके किती कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, हे आताच सांगता येणार नाही. कारण दावोसमध्ये गेलेली राज्य सरकारची टीम अद्याप परतलेली नाही. ही टीम परत आल्यानंतरच कोणत्या कंपन्यांनी किती आणि कोठे गुंतवणूक केली, याचे चित्र स्पष्ट होईल. हे सामंजस्य करार आकडेवारी वाढविण्यासाठी नसून प्रत्यक्षात राज्यात उद्योग सुरु व्हावेत, यासाठी केलेले आहेत. त्यामुळे याबाबत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांत फारसे तथ्य नाही. विरोधकांना सध्या सरकारला विरोध करण्याशिवाय दुसरं काही कामही नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विरोधकांनी कितीही आरोप करू द्या, आम्ही त्यांना कामातून विरोध देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
