तुम्हाला माहित आहे का मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?

लाईफस्टाईल : कोणत्याही शुभ कार्याला काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र मकर संक्रांत असा एक सण आहे ज्या सणाला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात?

मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. थंडी कमी होऊ लागते. काळोख्या रात्रींना काळ्या रंगाचे कपडे घालून आपण निरोप देतो असं मानलं जातं.

मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे दुसरे कारण म्हणजे ज्याप्रमाणे पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करण्यास मदत करतो, अजिबात उष्णता शोषून घेत नाही. त्याविरुद्ध काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असते. थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर अधिक ऊबदार राहावे यासाठीच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. तिळगूळाने देखील शरीरातील उष्णता टिकून राहाते म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करून तिळगूळ देण्याची प्रथा आहे. 

नववधूंसाठी या सणाला विशेष महत्व देण्यात येते. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते.