कोल्हापूर तापमानात तब्बल 4 अंश सेल्सिअसने घट

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या वातावरणात गरमी जाणवत असतानाच गेल्या 24 तासांपासून तापमानात तब्बल 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. रात्रीचा पारा तब्बल 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने वातावरणात चांगलीच बोचरी थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूरमध्ये थंडी जाणवत आहे. रविवारी दिवसभरात तापमानात दोन अंशाने घसरण झाल्यानंतर रात्रीही आणखी दोन अंशाने पारा घसरल्याने हुडहुडी जाणवू लागली. चार अंश सेल्सिअसने पारा घसरल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्रीची वर्दळही मंदावल्याचे दिसून आले. आज दिवसभरापासून वातावरण निरभ्र असले, तरी थंडी जाणवत आहे. आजही रात्रीचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पारा 10 पर्यंत खाली आल्यास कोल्हापूरच्या आजवरच्या थंडीच्या तापमानाचा विक्रम मोडित निघण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706