
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला आज दिले.

तसेच आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दहशतवादविरोधी पथकाला दिले.पानसरे हत्याकांडमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि कुमार केतकर यांच्यासह सुमारे ४० जणांची नावेही मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर होती, अशी माहिती पानसरे कुटुंबीयांच्या वतीने ॲड. अभय नेवगी यांनी न्यायालयात दिली.
त्यामुळे या कटकारस्थानाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी न्यायालयाने संबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने सन २०१५ मध्ये करण्यात आलेली याचिका आता का प्रलंबित ठेवावी, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी नेवगी यांनी केली आहे. विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी पानसरे खटल्यात साक्षीदार दाखवले आहेत.
