
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे समजूतदारपणा दाखवतात, पण अजित पवार सगळ्यांना ‘ओळखून’ आहेत. ते सगळ्यांना नीट करतील. त्यामुळे, अजित पवार यांच्याकडे काही तालुक्यांची सूत्रे द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि ग्रामीण भागांतील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांनी गुरुवारी बैठक घेतली. मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत पक्षातील गटबाजीबाबत कार्यकर्त्यांनी थेट पवार यांच्याकडे तक्रार मांडली. गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पक्षातील गटातटामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर जात आहे, अशा तक्रारींचा पाढा कार्यकर्त्यांनी मांडला.
