
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला आहे. त्यावरून आता विरोधकांनी जे पोटात होतं, तेच ओठावर आलं, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीने बावनकुळे यांना घेरलं आहे.

तर बावनकुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यावर सारवासारव केली आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. उद्या ते कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणजे काय असतं रणनीती? त्यांना माहिती आहे का रणनीती म्हणजे काय? खोके, पेट्या, पाकिटं कुठे कशी वाटायची? कुणाला कसं विकत घ्यायचं? ही रणनीती असते त्यांची. रणनीती ठरवायची तर लोकं ठरवतील. मतदार ठरवतील. काय करायचं याची लोकं वाट बघत आहेत. खोकेवाले कधी येताहेत त्याची वाट पाहत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
