
औरंगाबाद – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी (दि. २ जानेवारी) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे.

सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे वरिष्ठ नेते हजर असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या ४ जागांवर दावा केला आहे. भागवत कराड यांनीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. तसेच, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चारही जागांवर भाजपचा दावा केला आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे १३ खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. तर, इतर खासदार आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत.