खुपिरेत प्रत्येक नववधूला मिळणार ग्रामपंचायतिची माहेरची साडी

कुडित्रे : श्रीकांत पाटील खुपिरे ग्रामपंचायतीने एक नवा ऐतिहासिक निर्णय नववर्षाचे निमित्त हाती घेतला आहे. लग्न ठरलेल्या प्रत्येक नववधूला दोन हजार रुपये रक्कमेची ‘माहेरची साडी’ देण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.

अनोखे उपक्रम राबवण्यात खुपिरे ग्रामपंचायत अग्रभागी असते. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रामध्ये सर्वधर्मसमभाव आणि ऐक्याची भुमिका असल्यामुळे निश्चितच आपला महाराष्ट्र आणि देश जुन्या चालीरिती आणि प्रथा यांना झुगारुन नविन विचारांच्या वाटेवर कार्यरत आहे. ज्या मातीत आपण जन्मलो, खेळलो, वाढलो त्या मातीचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतूनच ही कल्पना समोर आली आहे. या जन्मभूमी आणि कर्मभूमीसाठी आपणंही काहीतरी समाजोपयोगी नाविन्यपूर्ण करावं, हा हेतू ठेऊन हा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर १ जानेवारी २०२३ पासून आपल्या गावातील लाडकी मुलगी लग्न करून सासरला जाताना ग्रामपंचायतीकडून माहेरची भेट म्हणून इथून पुढे लग्न होणाऱ्या गावातील प्रत्येक नववधू मैत्रीणी, भगिनींसाठी दोन हजार रुपये रक्कमेची “माहेरची साडी” ग्रामपंचायत खुपीरेच्या वतीने “माहेरचा आहेर” म्हणून भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत लाभ घेणारी मुलगी आपल्या गावातील रहिवाशी आसली पाहिजे, व लग्न होण्याच्या आठ ते दहा दिवसा आधी ग्रामपंचायत कार्यालयात लग्न पत्रिका देऊन कळवावे असे आवाहन सरपंच सौ. दिपाली रमेश जांभळे, उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी केले आहे.

🤙 8080365706